मूळव्याध रामबाण औषध (Piles / Mulvyadh / Bavasir)

मूळव्याध रामबाण औषध (Piles / Mulvyadh / Bavasir)
मूळव्याधीचे प्रकार

शुक्रवार, ६ नोव्हेंबर, २००९

घरोघरी असाव्यात अशा वनस्पती

वने-उपवने नगरांची शोभा वाढवतात. अंगणातील बगीचा घराला प्रतिष्ठाही देतो; पण वृक्षवल्ली केवळ शोभेसाठी नसतात.
बहुगुणी वनस्पतींचे घराच्या आसपासचे अस्तित्व मनुष्याला आरोग्य देते. म्हणूनच गच्चीत कुंडीत का होईना झाडे वाढवली पाहिजेत. आपल्याबरोबर झाडे वाढवली पाहिजेत. ती शुद्ध हवा देतील. डोळ्यांना शांती देतील. आरोग्याच्या छोट्या छोट्या तक्रारींवर हाताशी आयते औषध पुरवतील.

प्राचीन भारतात नगर असो वा घर असो, बागेशिवाय पूर्ण होत नसे. नंदनवन, अशोकवन, इंद्रप्रस्थातील उपवन अशा अनेक बाग-बगीच्यांचे उल्लेख भारतीय साहित्यात सापडतात. घराच्या गच्चीत वा घराशेजारी बाग असणे हे आजही प्रतिष्ठेचे लक्षण समजले जाते. प्रत्येक घरात किमान तुळशीचे छोटे रोपटे तरी असतेच.

तुळशीच्या बरोबरीने अजूनही काही वनस्पती अशा आहेत, की त्या घरोघरी असाव्यात. छोट्याशा कुंडीतही सहज लागतील, वेळेवर पाणी दिले, तर चांगल्या प्रकारे वाढतील आणि लहानसहान तक्रारींवर इलाज करण्यासाठी हाताशी असतील अशा काही वनस्पतींची माहिती आज आपण करून घेणार आहोत. तुळस - आपल्या नुसत्या अस्तित्वानेही उपयोगी पडणाऱ्या वनस्पतींमध्ये अग्रणी ठरावी अशी ही वनस्पती. तुळशीच्या आसपासची हवा शुद्ध राहत असल्याने घरात तुळस असणे हे आरोग्यप्रद समजले जाते.

तुळशीची दोन - तीन पाने रोजच्या चहात टाकल्याने एकंदर रोगप्रतिकारशक्‍ती चांगली राहून, सर्दी-खोकला-ताप किंवा यांसारख्या साथीच्या रोगांना प्रतिबंध होताना दिसतो.

खोकला झाल्यावरही तुळशीचा अर्धा चमचा रस मधासह घेतल्याने बरे वाटते. सर्दीवरही तुळशीचा काढा पिण्याने बरे वाटते.

नायट्यासारख्या कंड सुटणाऱ्या त्वचारोगांवर तुळशीच्या पानांचा रस चोळण्याने कंड कमी होण्यास मदत मिळते.

कोरफड - कोरफड कुंडीत सहज लागते व थोड्याशा पाण्यावरही झपाट्याने वाढते. कोरफडीचा गर रोज सेवन करण्याचे; तसेच बाहेरून लावण्याचे अनेक फायदे आहेत. यकृताची कार्यक्षमता उत्तम राहण्यासाठी आणि वाढविण्यासाठी कोरफडीसारखे उत्तम औषध नाही. कोरफडीचा चमचाभर गर छोट्या कढईत मंद आचेवर गरम करून त्यावर चिमूटभर हळद टाकून घेणे यकृतासाठी हितावह असते. याप्रमाणे काही दिवस नियमाने कोरफड घेतल्यास भूक चांगली लागते व शौचास साफ होण्यासही मदत मिळते.

रोज सकाळी कोरफडीचा चमचाभर गर घेण्याने स्त्रियांच्या बाबतीत पाळी नियमित येण्यास मदत मिळते. अंगावरून कमी रक्‍तस्राव होत असल्यास किंवा पाळीच्या वेळेला गाठी पडून वेदना होत असल्यास कोरफडीचा गर घेणे उपयोगी ठरते.

शरीरावर कोठेही भाजले असता कोरफडीचा गर लावल्याने दाह कमी होतो व फोड वगैरे न येता त्वचा पूर्ववत होते. मूळव्याधीमुळे वेदना होत असल्यास किंवा आग होत असल्यास त्यावर कोरफडीचा नुसता गर ठेवण्याने बरे वाटते.

कोरफडीचा ताजा गर न्हाण्यापूर्वी केसांना लावून ठेवण्याने केस निरोगी राहण्यास मदत मिळते; तसेच कंडिशनिंग होते. त्वचेवरही कोरफडीचा गर लावल्याने त्वचा मऊ व सतेज राहण्यास मदत मिळते.

संगणकावर वा इतर कोणत्याही प्रखर प्रकाशाकडे पाहण्याने डोळे थकले, लाल झाले वा डोळ्यांची आग होऊ लागली, तर कोरफडीच्या गराची चकती बंद पापण्यांवर ठेवण्याने लगेच बरे वाटते. चकती ठेवणे अवघड वाटले, तर गराची पुरचुंडी करून डोळ्यांवर वारंवार फिरविण्याने बरे वाटते.

याप्रमाणे कोरफडीचे एकाहून एक उत्तम उपयोग असल्याने आजकाल कोरफडीचा गर बाटलीत भरून विकायला ठेवतात; पण टिकण्याच्या दृष्टीने यात प्रिझर्वेटिव्ह्‌ज टाकली आहेत का हे बघावे लागेल व कोरफडीतील एखादे तत्त्व नष्ट झाले आहे का हेही पाहावे लागेल. त्यापेक्षा घरी कोरफड लावली, तर घरच्या घरी कोरफडीचा ताजा गर सहज मिळू शकतो.

गवती चहा - गवती चहा कुंडीतही सहज येतो. रोजच्या चहात गवती चहाच्या ताच्या पातीचे कात्रीने तुकडे करून टाकले असता चहा स्वादिष्ट बनतो. चहापत्ती न टाकता नुसता गवती चहाचा चहासुद्धा अतिशय रुचकर असतो. असा चहा तापामध्ये फार हितकर असतो. गवती चहा, सुंठ व खडीसाखर यांचा कडक चहा घेऊन जाड पांघरूण घेऊन झोपले असता घाम येऊन ताप, थंडी वाजणे कमी होते. सर्दी, पडसे, घसा दुखणे, ताप यांसारख्या तक्रारींवर गवती चहा, आले, दालचिनी, पुदिना यांचा काढा घेण्यानेही बरे वाटते. गवती चहाचा काढा घेतला असता लघवी साफ होण्यासाठी मदत मिळते.

पुदिना - पुदिन्याच्या नुसत्या काड्या कुंडीत लावल्या तरी पुदिना फोफावतो. पुदिना पाचक असतो. अरुची नष्ट करतो व गॅस, पोटदुखी वगैरे त्रासांवर उपयुक्‍त असतो.

गॅसमुळे पोट फुगून दुखत असल्यास अर्धा चमचा पुदिन्याच्या रसात अर्धा चमचा आल्याचा रस, चवीनुसार जिरे पूड व काळे मीठ घालून घेतल्यास बरे वाटते.

तोंडाला चव नसल्यास पुदिन्याची ताजी पाने कापून त्यावर थोडेसे लिंबू व सैंधव टाकून जेवण्यापूर्वी खाण्याने बरे वाटते.

आले, पुदिना, गवती चहा यांच्यापासून बनविलेला हर्बल चहा घेण्याने पचन व्यवस्थित राहते. विशेषतः हिवाळ्यात व पावसाळ्यात काहीतरी गरम पेय घ्यावेसे वाटते अशा वेळी साध्या चहाऐवजी असा हर्बल चहा घेणे चांगले असते.

कढीपत्ता - थोड्या मोठ्या कुंडीत कढीपत्त्याचे साधारण उंचीचे झाड लावता येते. जमिनीत तर कढीपत्त्याचे झाड चांगलेच वाढते. कढीपत्त्याच्या झाडाच्या आसपासची हवा शुद्ध असते असे समजले जाते. तोंडाची चव बिघडली असता, अन्नास रुची वाटत नसल्यास कढीपत्त्याची चार - पाच पाने चावण्याने व नंतर थुंकून टाकल्याने तोंड स्वच्छ होते, रुचीयुक्‍त होते.

अंगावर कोळी वा तत्सम कीडा चिरडला गेल्यामुळे त्या ठिकाणी आग होऊ असली, खाज सुटत असली, तर त्या ठिकाणी कढीपत्त्याची पाने चुरून चोळल्याने बरे वाटते.

अडुळसा - अडुळशाचे छोटे झुडूप असते; पण जराशा मोठ्या कुंडीतही अडुळसा वाढतो. अडुळशाचे पिकलेले पान खोकल्यासाठी विशेष उपयुक्‍त असते. अडुळशाची पिकलेली दोन - तीन पाने, ज्येष्ठमध, काळी द्राक्षे यांचा काढा साखर टाकून घोट घोट घेण्याने आराम पडतो. अडुळशाच्या पानांचा रस मधात मिसळून वारंवार चाटल्याने कफ सुटा व्हायला मदत मिळते, घसा मोकळा होतो व बरे वाटते. नाकातून रक्‍त येत असल्यास डोक्‍यावर अडुळशाच्या पानांचा लेप करण्याचा फायदा होतो. स्त्रियांमध्ये पाळीच्या दिवसांत अति प्रमाणात रक्‍तस्राव होत असल्यास अडुळशाच्या पानांचा रस मधाबरोबर घेण्याने बरे वाटते.

ओव्याची पाने - या पानांना एक छान सुगंध असतो; तसेच ही पाने पाचक असतात. भूक लागत नसल्यास जेवणाअगोदर ओव्याचे पान चावून खाण्याचा उपयोग होतो. ओव्याच्या पानांची चटणी पचनास मदत करते.

लहान मुलांना सर्दी, खोकला झाला असता ओव्याच्या पानांचा रस काढून मधासह थोडा थोडा दिला असता आराम मिळतो.

ओव्याची पाने किंचित गरम करून छाती-पाठीवर शेक करण्याने लहान मुलांचा खोकल्याचा त्रास कमी होतो. ओव्याच्या पानांची भजी करण्याची पद्धत आहे.

रुई - रुईचे झाड रानोमाळ कुठेही उगवते. त्यामुळे ते सहसा कुंडीत लावले जात नाही; पण रुई कुंडीतही चांगली उगवते. घराच्या आवारात रुईचे एखादे तरी झाड लावावे.

लहान मुलांचे पोट वायूने फुगले असता पोटाला तेल लावून रुईच्या पानाला थोडे तेल लावून गरम करून शेक दिला असता पोट ओसरते. याने पोट दुखणेही कमी होते.

खोकला-दम्याच्या त्रासावरही छाती-पाठीला रुईच्या पानांचा शेक करण्याने पटकन बरे वाटते.

अशा प्रकारे फार मोठी जागा नसली, तरी कुंड्यांमधून या प्रकारे वनस्पती लावता येतात व साध्या साध्या त्रासांवर उपयोगी ठरू शकतात.

डॉ. श्री बालाजी तांबे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा